Showing posts with label Quotes-Marathi. Show all posts
Showing posts with label Quotes-Marathi. Show all posts

समाजाचे 'राज्यकर्ते व सामान्य जनता'असे वर्ग पडतात हे दुर्दैव

 *"सर्व राजकीय समाजाचे 'राज्यकर्ते व सामान्य जनता' असे वर्ग पडतात हे दुर्दैव आहे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (१९४३)
*********
दि. १७ सप्टेंबर १९४३, दिल्ली येथे 'द इंडियन फेडरेशन ऑफ लेबर' या संस्थेच्या विद्यमाने आयोजित 'द ऑल इंडिया ट्रेड युनियन वर्कर्स स्टडी कॅम्प'च्या समारोपीय सत्रात बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातून...
*****
"सर्व राजकीय समाजाचे 'राज्यकर्ते व सामान्य जनता' असे वर्ग पडतात हे दुर्दैव आहे. एवढ्यावरच हे थांबते तर हरकत नव्हती, पण त्याच्यावर ताण म्हणजे हे दोन तट इतके कायम राहतात, की समाजाच्या एका विशिष्ट घटकातूनच राज्यकर्ते निवडले जातात, सर्वसाधारण जनता तशीच राहते. जनता स्वतः राज्य करीत नाही, ती फक्त शासनसंस्था स्थापन करते आणि त्यापुढे त्यापासून अलिप्त राहते आणि ते राज्य आपले राज्य आहे हे विसरते. असे झाल्यामुळे पार्लमेंटरी लोकशाही जनतेचे राज्य कधीच स्थापू शकली नाही. थोडक्यात म्हणजे जनतेच्या राज्याचे बाह्य अवडंबर असूनही वस्तुतः ते एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर परंपरागत चालणारे राज्य झाले आहे‌. या दोषांमुळेच पार्लमेंटरी लोकशाही अयशस्वी ठरली आणि जनतेची सौख्याची आशा पूर्ण करू शकली नाही.

मग प्रश्न असा उभा राहतो, की याला जबाबदार कोण? गरीबगुरीब, कामगार व इतर दलित जनता यांचे पार्लमेंटरी लोकशाहीने हित केले नाही हे खरे. पण त्याला तेच मुख्यतः जबाबदार आहेत. आपण असे बघा, की मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे हे तेच विसरले नाहीत का? मी नुकतेच 'आर्थिक मानवाचा मृत्यू' या नावाचे पुस्तक बघितले. पण आर्थिक मानवाचा अजून जन्मच झाला नाही, तर त्याच्या मृत्यूचा प्रश्नच येत नाही. नुसत्या अन्नावरच मनुष्य जगत नसतो हा मार्क्सच्या टीकाकारांनी त्याला दिलेला टोमणा दुर्दैवाने खरा आहे. या मानवाने नुसते डुकरासारखे लठ्ठ होणे हे संस्कृतीचे ध्येय नाही हे कार्लाइलचे म्हणणे मला पटते. पण कामगार लठ्ठ होण्याचे तर दूरच राहो, त्यांना पोटभर देखील अन्न मिळत नाही. मी तर असे म्हणेन, की सर्व सोडून अन्नाचाच विचार कामगारांनी प्रथम केला पाहिजे.

मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे आणि म्हणून आर्थिक परिस्थितीप्रमाणे इतिहास घडत असतो ही विचारसरणी मार्क्सने जगाच्या पुढे ठेवल्यापासून त्यावर वाद झाले आहेत. पण माझ्या मते त्याने हे तत्त्व म्हणून ही विचारसरणी मांडली नसून त्यायोगे कामगारांना शिकवणूक दिली, की ज्याप्रमाणे वरिष्ठ वर्ग आर्थिक बाबींना महत्त्व देतात त्याचप्रमाणे कामगारांनी दिल्यास इतिहास म्हणजे आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब होईल. मार्क्सचे तत्त्व खरे असलेले आपल्याला वाटत नाही याचे कारणच मुळी हे, की आर्थिक परिस्थितीचा समाजरचनेवर जो परिणाम होतो त्याचे महत्त्व कामगारांनी लक्षात घेतले नाही. शासन पद्धतीविषयीचे वाङमय त्यांनी वाचले नाही. रुसोचे 'सामाजिक करार',  मार्क्सचा 'कम्युनिस्ट जाहीरनामा', पोप १३वा लिओचे 'कामगाराची स्थिती' आणि जॉन स्टुअर्ट मिलचे 'स्वातंत्र्य' ही समाज रचनेविषयीची चार मूलभूत पुस्तके कामगारांनी वाचलीच पाहिजेत. पण मला नक्की ठाऊक आहे, की कामगार त्यांना महत्त्व देणार नाहीत. त्यांनी राजाराणीच्या गोष्टी वाचण्याचा नाद आधीपासून लावून घेतला आहे."
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग २, 'शासनयंत्रणेचा ताबा घेणे कामगारांचे ध्येय असावे', पान क्र. ४३५-४४१)
********

शिक्षणाच्या अभावी माणूस जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो

 *"शिक्षणाच्या अभावी माणूस जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (जुलै १९२७)
*********
"उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाचे अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो. अर्थात, मुलांच्या शरिराची व बुद्धीची शक्य तेवढी चांगली जोपासना करणे हे प्रत्येक आईबापाचे कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचशा लोकांच्या हातून शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कर्तव्य पार पडत नाही. पोट हे दरेकाच्या मागे लागलेले असते व ते भरण्यास अनेक लोक अनेक प्रकारचे व्यवसाय करीत असतात. एकदा एक व्यवसाय पिढीजात झाला म्हणजे तोच पुढे चालू होतो; त्यात सहसा बदल होत नाही. या अनेक व्यवसायांपैकी शिक्षण हा एक व्यवसाय आहे व ज्या जाती त्यांत पडतात त्यांचा तो धंदा होऊन बसतो. ब्राह्मण लोक शिक्षण घेतात व इतर वर्ग घेत नाहीत याचे तरी कारण हेच की शिक्षण हा जसा ब्राह्मण जातीचा धंदा झाला आहे तसा तो इतर जातींचा झालेला नाही. तुम्ही शिक्षण घ्या म्हटले असता आम्हाला काय ब्राह्मण व्हायचे आहे, असे जे अब्राह्मण लोकांकडून उत्तर मिळते त्याचे इंगित यातच आहे. शिवाय अब्राह्मण लोकांत मुलाबाळांना शिक्षण देण्याची मनापासूनची इच्छा असली तरी ती सहज सफल होत नाही. मुलाला शाळेत घातले तर त्याचा दुहेरी बोजा आईबापांवर पडतो. एक तर मुलगा शाळेत गेला तर त्याच्यापासून होणारी कमाई बंद होते व तो आईबापांच्या अंगावर पोस पडतो. दुसरे, त्याच्या शिक्षणासाठी होणारा खर्च त्याच्या आईबापांस सोसावा लागतो. म्हणजे शिक्षणाच्या पायी कमाईची आयात बंद होऊन खर्चाच्या निर्गतीला मात्र सुरुवात होते. त्यामुळे हातावर कमवून जीवित कंठणाऱ्या आईबापांना खर्चाचा बोजा झेपत नाही व म्हणून त्यांची प्रजा पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या गर्तेत खितपत पडलेली असते." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.(१९२७)

********
अग्रलेख ("आप घरी बाटा, बाप घरीही बाटा!") : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७
********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९, पान क्र. २१२-२१८)
********

सत्यशोधकी चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ

 *"आम्हीही सत्यशोधकीच आहोत; सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सद्धर्माची चळवळ." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (बहिष्कृत भारत, ३ फेब्रुवारी १९२८)
*********

"आमच्या मित्रांना आमच्या चळवळीस सत्यशोधकी वळण लागेल याचे भय वाटत आहे. सत्यशोधकी चळवळ म्हणजे ब्राह्मणाचा द्वेष करणारी, राजकारणांत भाग न घेणारी, सरकारच्या नजरेकडे लक्ष ठेवून काम करणारी अशी आजपर्यंतची महाराष्ट्रांतील रुढ कल्पना आहे. व या कल्पनेंत समाविष्ट असलेले वळण अस्पृश्यांच्या चळवळीस न लागेल अशी खबरदारी घेण्याविषयी त्यांनी आम्हांस इशारा दिला आहे. आमच्या मित्रास आम्ही असे सुचवितो की, आम्हीही सत्यशोधकीच आहोत. व त्याबद्दल आम्हांस कोणत्याही तर्‍हेचा विषाद न वाटता उलट आनंदच वाटतो. *सत्यशोधकी चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ असे आमचे ठाम मत आहे. इतकेच नव्हे तर दरेक स्वराज्यवाद्याने सत्यशोधकी असलेच पाहिजे असे आमचे ठाम मत आहे.* आमच्या मित्रांनी चालू सत्यशोधकी चळवळीवर जो आरोप केला आहे तो मात्र काही अंशी खरा आहे असे कबूल करणे प्राप्त आहे. परंतु हे वळण या चळवळीस का लागले याचा विचार आमच्या मित्रांनी जितका करावयास पाहिजे होता तितका केला नाही असे आम्हास म्हणावे लागते. सत्यशोधकी चळवळीला अशा प्रकारचे अनिष्ट वळण लागल्याचे मुख्य कारण म्हटले म्हणजे ब्राह्मण जातीचा त्या चळवळीस होणारा एकजात विरोध हेच होय. *ब्राह्मण जातीतील काही लोकांनी तरी सत्यशोधकी चळवळीने आपल्यापुढे मांडलेली समानतेची व सद्धर्माची तत्त्वे मान्य केली असती तर सत्यशोधकी चळवळीस ब्राह्मण द्वेषाचे भूत लागले नसते. किंवा तिच्या प्रसारार्थ तिला सरकारची कासही धरावी लागली नसती.* अशी परिस्थिती असल्याकारणाने आमच्या मित्रांस आमची अशी सूचना आहे की, त्यांनी सत्यशोधक व्हावे आणि आपल्या जातभाईसहि सत्यशोधक बनविण्याचा प्रयत्न करावा." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.(१९२८)

********
आजकालचे प्रश्न: बहिष्कृत भारत, ता. ३ फेब्रुवारी १९२८
********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९, पान क्र. ३१८-३३२)
********

सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून कॉंग्रेसने आपला प्रांजळपणा सिद्ध करावा

 *"अस्पृश्य लोकांसंबंधीचा कॉंग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत?" ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*********
ता. २७ ऑक्टोबर १९५१, जालंदर.
*****
"विभाजनानंतर पाकिस्तान सरकारने अस्पृश्यांना पाकिस्तानातून भारतात येण्यावर बंदी घालणारे एक फर्मान काढले. कितीही हिंदूंनी पाकिस्तान सोडले तरी पाक सरकारने त्यांची पर्वा केली नाही; परंतु अस्पृश्यांनी पाकिस्तान सोडले तर मैला वाहण्याचे, सडका झाडण्याचे, मेलेली जनावरे उचलण्याचे तिरस्करणीय जातीचे घाणेरडे धंदे कोण करणार होते? मी पं. नेहरूंना विनंती केली की या लोकांच्या स्थलांतर करण्यावर बंदी घालणारा हा आदेश काढून घेण्यासंबंधी काहीतरी कारवाई करा. परंतु त्यांनी काहीही केले नाही. या समस्येसंबंधी ते झोपी गेले आणि पाकिस्तानशी ज्या काही चर्चा वेळोवेळी झाल्या त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचा प्रासंगिक उल्लेखही केला नाही. एकाकीपणे जेवढे मला करता येणे शक्य होते तेवढे मी केले आहे. महार बटालियनच्या शूर शिपायांनी गंभीर धोका पत्करून मला मदत केली आणि पाकिस्तानातून अनेक अस्पृश्य लोकांना आणले.

अशा स्थितीत आम्ही काँग्रेस पुढाऱ्यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवावा? अस्पृश्य लोकांसंबंधीचा कॉंग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत?" ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३, पान क्र. २५१)
********

बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल

*"बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

"जगापुढे, विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजीक जाईल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ फेब्रुवारी १९५३, नवी दिल्ली.
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही उन्नतीची आद्य कारणे

 *"आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळ अपूर्व आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*

(दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद, माणगाव, संस्थान कागल- दिवस पहिला. ~याच माणगावच्या परिषदेत दुसऱ्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे भाषण झाले.)

"ही परिषद अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे व आपल्या लोकात आपल्या जातीबद्दल दिसून येत असलेली कळकळ ही देखील तितकीच अपूर्व आहे. त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांतीही तशीच अपूर्व आहे. आजवर आपल्या लोकास वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्याकारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे.

ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्यमात्राचे संघटन दोन आदितत्त्वांना धरून झालेले दृष्टीस पडते. एक जन्मसिद्ध योग्य-अयोग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्र-अपवित्रता. या दोन तत्त्वांनुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे तीन वर्ग होतात. १.जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो तो. २.ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग ३.जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो तो आपला बहिष्कृत वर्ग होय. अशारीतीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या तीन वर्गांवर परिणाम झाला आहे. *जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व  पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे.* ब्राम्हणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत. तरीपण विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांच्याजवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार आहे. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे. अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे *नैतिकदृष्ट्या आपल्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे* ती अगदी लोपून गेली आहेत. सामाजिकदृष्ट्या हिंदू धर्माप्रमाणे त्यांना हक्क नाहीत. त्यांना शाळेत जाता येत नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही व रस्त्यावर चालता येत नाही. वाहनाचा उपयोग करून घेता येत नाही. इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ हक्कांनादेखील ते दुरावले आहेत. जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झाले आहे. व्यापार, नोकरी व शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत ते त्यांना खुले नाहीत. विटाळामुळे गिर्‍हाईक मिळत नसल्याकारणाने त्यांना व्यापार करण्याची सोय उरली नाही. शिवाशिवीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही व कधीकधी गुणाने योग्य असूनही खालच्या जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी करण्यास कचरतात. म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते. याच भावनेमुळे मिलिटरीतून त्यांचा उठाव झाला आहे. शेतीच्या बाबत त्यांची तीच दशा आहे. अशा हाडकी हडवळ्यापेक्षा भुईचा तुकडा विशेष कोणाला आहे? 
 
अशाप्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती होणार नाही. *नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही दोन उन्नतीची आद्य कारणे आहेत. बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाण नाही हे सर्वांस मान्य आहे. परंतु त्यांचा विकास होत नाही याचे मूळ कारण त्यांना परिस्थिती सानुकूल नाही हे होय.* परिस्थिती सानुकूल करून घेण्यास अनेक उपाय सुचविले जातात; परंतु याकरिता आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे व जातवार प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही. "सत्यमेव जयते" हे तत्त्व पोकळ आहे. सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर


माणगाव, 21 मार्च 1920
**********
मूकनायक: 10 एप्रिल 1920
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)

ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे

*"आज देशात चारित्र्य उरलेले नाही. ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये रविवार दिनांक 31 जानेवारी 1954 रोजी आचार्य अत्रे यांच्या *'महात्मा फुले'* या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त समारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले होते आणि कर्मवीर भाऊराव पाटील आशीर्वाद देण्यासाठी आचार्य अत्रे यांच्या निमंत्रणावरून उपस्थित झाले होते.

श्री. प्र. के. अत्रे उपस्थित पाहुण्यांचे आभार मानताना म्हणाले, "महात्मा फुले ह्यांचे क्रांतिकारक जीवन रूपेरी पडद्यावर आणण्याचे माझे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकार होत आहे याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. पुणे शहराच्या ज्या विभागात फुले यांनी शंभर वर्षांपूर्वी काम केले त्याच क्षेत्रात माझी अनेक वर्षे गेली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि परंपरेचा माझ्या मनावर फार परिणाम झाला आहे. या चित्रपटाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे हा सर्वात मोठा सुयोग आहे. कारण महात्मा फुले ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे सर्वात मोठे अनुयायी जर कोणी असतील तर ते डॉ. आंबेडकर हेच होत. राजकारणातील, धर्मकारणातील आणि समाजकारणातील डॉ. आंबेडकरांची भूमिका सर्वस्वी महात्मा फुले यांच्यासारखीच आहे. म्हणून महात्मा फुले यांच्याबद्दल त्या काळात जो गैरसमज झाला तोच डॉ. आंबेडकर यांच्या आजही वाट्याला येत आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे या चित्रपटाला आशीर्वाद द्यावयास येथे उपस्थित राहिले हाही दुसरा सुयोग आहे. कारण त्यांनी आपले सबंध आयुष्य महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारामध्ये खर्च केले.
इंग्रजी भाषेत फुले यांचे चरित्र लिहिण्याची डॉ. आंबेडकर यांची इच्छा आहे हे मला माहीत आहे. पण साधनांच्या अभावी ते तसेच पडून आहे. माझे काम झाल्यानंतर सर्व सामुग्री त्यांच्या हवाली करण्याची माझी इच्छा आहे. फुले यांच्या जीवनासंबंधी सर्वसामान्य समाजात अज्ञान पसरलेले आहे. या चित्रपटाद्वारे महात्मा फुले यांच्या जीवनाचे दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न करीत आहे."

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, "हे काम हाती घेतल्याबद्दल मी श्री. अत्रे यांचे अभिनंदन करतो. कारण जोतीराव फुले हे आद्य समाजसुधारक होत. पूर्वी सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी हा वाद चाले. आधी समाज सुधारणा झाल्या पाहिजेत असे रानडे, गोखले, आगरकर प्रतिपादन करीत; पण टिळकांचा भर राजकीय सुधारणांवर होता. टिळक आपल्या विरोधकांवर याबाबतीत विजय मिळवू शकले नाहीत. पण पुढे महात्मा गांधींनी मात्र समाजसुधारणावाद्यांवर विजय मिळविला. परंतु समाजसुधारणा होण्यापूर्वी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले त्याचे परिणाम फारसे चांगले झालेले नाहीत. आज देशात चारित्र्यच उरलेले नाही. आणि ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य अतिशय खडतर आहे. जवाहरलाल नेहरू, तुमचे मुख्यमंत्री असोत वा मोरारजी देसाई असोत,  तुमच्या भविष्यात काळोखच भरला आहे. देशाचे मंत्री देशाचा उद्धार करीत नाहीत, तर धर्म ज्याला उत्तम रीतीने समजला आहे तोच देशाला तारू शकेल. महात्मा फुले अशा धर्मसुधारकांपैकी होते. त्यादृष्टीने ह्या थोर समाजसुधारकाच्या जीवनावर आधारलेला हा बोलपट उपयुक्त ठरेल."

जनता: ६ फेब्रुवारी १९५४
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
#आचार्य_अत्रे #महात्मा_फुले #चरित्र #डॉ_आंबेडकर #चित्रपट

टीका करण्याचा हक्क कोणाचा?

बौद्ध धर्म स्वीकारण्याबद्दल सर्व वर्तमानपत्रात टीका केलेली असायची. त्याचा परामर्श घेताना बाबासाहेब म्हणतात:

"टीका करण्याचा हक्क कोणाचा? कोणी कोणावर टीका करायची? ज्याला सहानुभूती आहे, त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो. संरक्षण करणाऱ्यालाच टीका करण्याचा अधिकार आहे. जीव घेणाऱ्याला-मारणाऱ्याला टीका करण्याचा अधिकार नाही. ......म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारावयाचे आहे की तुम्ही आमचे रक्षणकर्ते की आमचे विनाशकर्ते? तुम्ही आहात तरी कोण? हजारो वर्षे आम्ही तुमच्या समाजात वावरत आलो. कोणीतरी पुढे येऊन सांगावे की अस्पृश्यांसाठी ह्या गोष्टी केल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगळीसुद्धा वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा काय अधिकार? ह्या लोकांना माझे असे सांगणे आहे की तुम्ही तोंड गप्प करून बसा. आम्हाला खड्ड्यात पडायचे असेल तर पडू. तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्ड्यात टाकलं. आता ते स्वातंत्र्य आम्हाला द्या. पडण्याचा अधिकार, चुका करण्याचा अधिकार आम्हाला द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. तुम्ही अस्पृश्यांच्या पोरांना विलायतेला पाठविलं आहे काय? त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत आहेत त्या मी मिळविल्या आहेत. आम्ही आमच्या पायावर उभे राहू." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.


दि. ८ मे १९५५, मुंबई, नरे पार्क येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणातून.
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा

"केंद्रीय सरकारात १९४७ साली मी सामील झालो. मी काँग्रेसला मिळालो अशी टीका माझ्या काही टीकाकारांनी माझ्यावर केली. माझ्या टीकाकारांनी केलेल्या निंदेला मी लखनौच्या भाषणात उत्तर दिले आहे. त्या भाषणात माझ्या देशबांधवांना मी सांगितले की पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या मातीच्या ढेकळाप्रमाणे मी भुसभुशीत नसून मी पाण्यात न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या एखाद्या भक्कम खडकासारखा आहे. मी कोठेही असलो किंवा कुणाच्याही संगतीत मी राहिलो तरी माझे स्वतःचे वैशिष्ट्य मी कधीही गमावणार नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी जर कोणी माझ्या सहकार्यासाठी विचारणा केली तर मी आनंदाने सहकार्य करीन. मागील चार वर्षेपर्यंत काँग्रेस सरकारशी मी माझ्या सर्व सामर्थ्यानिशी प्रामाणिकपणे माझ्या मातृभूमीची सेवा करण्यात सहकार्य केले. परंतु या संपूर्ण काळाच्या दरम्यान काँग्रेस संघटनेत मी विरून जाण्यापासून स्वतःला अलिप्त राखले आहे. जे लोक आपल्या शब्दाशी व कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून अस्पृश्यांच्या कार्यात मदत करू इच्छितात त्यांच्याशी मी आनंदाने सहकार्य करून त्यांना मदत करेन. जे केवळ गोडबोले व गोड गोड थापा मारणारे आहेत परंतु ज्यांचा अंतस्थ हेतू आणि कृती आमच्या लोकांच्या हिताच्या विरोधी असते त्यांना मी कदापिही मदत करणार नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. २७ ऑक्टोबर १९५१, जालंदर येथे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणातून.
**********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

धर्मास ग्लानी का येते?

"मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली-
पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता अशा धर्म टिकतो.

दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्म ग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते.

आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.

आपण बौद्ध धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही काळापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धांची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन-चार हजार बुद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ ऑक्टोबर १९५६, नागपूर. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यातील भाषणातून.

शील आणि शिक्षणाशिवाय काहीच साध्य होणार नाही

"तुम्ही एक गोष्ट कधीही विसरता कामा नये आणि ती ही की, 'शील आणि शिक्षण हे जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही.' दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळविण्याकरिता लढा चालविला आहे; त्यात तुम्हास यशस्वी व्हावयाचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसाच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे. हे तुम्ही जर करणार नाही तर ध्यानात ठेवा, तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्तेत पडाल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. ११ फेब्रुवारी १९३६, अहमदनगर

विद्यार्थ्यांनी निरंतर ज्ञानार्जन हेच ध्येय ठेवावे

"विद्यार्थीदशेत ज्ञानार्जन चालू असता विद्यार्थ्यांनी आपल्यापुढे निरंतर "ज्ञानार्जन" हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही. या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे. समाजसेवेस पुढील आयुष्यात विपुल काळ आहे. विद्यार्थिदशेत व्याख्यान देऊन समाजाचे होणारे तात्कालिक हित हे पूर्ण ज्ञान संपादन झाल्यानंतर अनेक प्रकारे अधिकार प्राप्तीने सेवा करता येऊन समाजाचे जे हित साधता येईल त्या हितापेक्षा शतपटीने हिणकस आहे. या तत्त्वांची पूर्ण जाणीव ठेवून शिक्षण प्राप्ती हेच आपले सध्याचे ध्येय ठेवावे."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १० सप्टेंबर १९३२, दामोदर हॉल, परळ, मुंबई

बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल

"जगापुढे, विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजीक जाईल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ फेब्रुवारी १९५३, नवी दिल्ली.

बौद्ध धर्म पुन्हा या देशाचा धर्म होईल

"बुद्ध या देशात 80 वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची 45 वर्षे प्रचारात घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्याजवळ मोटार नव्हती. साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश-कल्याणाकरिता तो जम्मुपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पाणी फिरला. बाराशे वर्षांपर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल सोसले, त्याचे नावही या देशात निघत नाही.
केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो, खर्‍याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हातरी जय होईलच. आणि आज ती वेळ आली आहे. बाराशे वर्षांचा धर्म पुनरपि या देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १४ जानेवारी १९५१, वरळी, मुंबई येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या बुद्धमेळ्यात केलेल्या भाषणातून.

जाती मोडण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक उपाय

"धर्म शुद्ध तत्त्वावर आधारित असला पाहिजे. बुद्धाचा वर्णाश्रम पद्धतीवर कधीच विश्वास नव्हता. 'आपण सर्व सारखेच आहोत' ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. माणसा-माणसात कसलाच भेदभाव नाही. जन्माने उच्च नीच कोणीच असू शकत नाही. उच्चनीचता करणीने प्राप्त होते. या गोष्टी बुद्धाने सांगितल्या आहेत. जर लोक पुन्हा बुद्धाचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा; हाच एक उपाय आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. २० मे १९५१, नवी दिल्ली येथे बुद्ध जयंतीला केलेल्या भाषणातून.

तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घालण्याची जबाबदारी

"स्वातंत्र्य, समता व भ्रातृभाव यांच्या आपण खूप गप्पा मारतो. नव्हे, या त्रयीवर आपण व्याखानेही झोडू शकतो. परंतु या तिन्हीपैकी एकतरी आपल्या भारतीय समाजात बसत आहे की नाही याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही तत्त्वांची आणि व्यवहाराची सांगड घालण्याची आपणावर काहीच जबाबदारी नसल्याचे वाटते.
 
भारतामध्ये बहुसंख्य जनता अज्ञान आणि भोळसर खुळ्या कल्पनेत गुरफटून गेली आहे. नव्हे, येथील समाजरचनाच खुळ्या कल्पनांना जन्म देते. म्हणून उपास-तापास, नवस-सायास, देव-देवऋषी करणे म्हणजे धर्म पालन करणे अशी लोकांची भावना झालेली आहे. या खुळ्या आणि धर्मभोळ्या जनतेची या कल्पनेतून सुटका करावयास पाहिजे. विद्यार्थ्यांनी चाळी-चाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत. तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठी उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा व प्रगती करण्याकरिता केला पाहिजे. तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.

जगातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडविण्याचा मानव सारखा प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच निरनिराळे सिद्धांत पुढे मांडण्यात येतात. कार्ल मार्क्स आज आपणापुढे खरा प्रश्न आहे. आजचे प्रश्न सोडविण्यास मार्क्सच्या विचारसरणीऐवजी दुसरी एखादी प्रभावी विचारसरणी उपयोगी पडेल काय? हाच आजच्या काळाचा प्रश्न आहे. आपले सारे प्रश्न सोडविण्यास कार्ल मार्क्सचे सिद्धांत समर्थ ठरतील की नाही हीच आजची समस्या आहे. ही समस्या आजच्या पिढीने शक्य तितक्या लवकर सोडविली पाहिजे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. २ मे १९५४, सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथील यूथ असेंब्लीच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून 
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही

"शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक कार्ये अंगीकारली. राजकारणात माझा विशेष महत्त्वाचा काळ गेला. सध्या राजकारणाच्या दोऱ्या उच्चवर्णीयांच्या हातात आहेत. त्या दोऱ्या तशाच हाती ठेवण्यासाठी उच्चवर्णीयांची धडपड चाललेली आहे. उच्च प्रतीच्या माऱ्याच्या जागा पटकावण्यासाठी जी विद्या पाहिजे ती अजून उच्चवर्णीयांखेरीज इतरांना प्राप्त झालेली नाही. "जिच्या हाती पाळण्याची दोरी..." असे काही म्हटले जाते, त्याचप्रमाणे राजकारणाच्या दोर्‍या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत. राजकीय सत्ता हाती यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत, पण त्यांना यश येत नाही. या तफावतीचे अधिष्ठान हेच आहे. इंजिनिअर, कलेक्टर वगैरे जागा फक्त उच्चवर्णीयांनाच शिक्षणामुळे मिळतात. शंभर पैकी जवळजवळ ९९ इंजिनिअर, ९९ कलेक्टर असे उच्चवर्णीयांचे असतात. त्यामुळे त्यांच्या हाताखालील जागा ते आपल्या लोकांना देत असतात." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १४ जानेवारी १९४८, धोबी तलाव नाईट स्कूल, मुंबई

माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे

"माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही. पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे. अधिकाराच्या व माऱ्याच्या जागी आमची माणसे हक्काने आली पाहिजे. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदार संघासाठी मी भांडलो. स्पृश्यांनी निवडलेली माणसे आम्हाला प्रतिनिधी नकोत म्हणून मी आग्रह धरला. अखेर मी विजयी झालो व स्वतंत्र मतदारसंघ मिळविला. पण गांधींना पोटदुखी उठली. अस्पृश्यांना स्वाभिमानाचे हक्क जे मिळाले ते दुष्टपणाने हिरावून घेण्यासाठी त्यांनी आमरण अन्नसत्याग्रह केला व आपले हक्क हिरावून घेतले. त्यामुळे आपल्याला फारच कमी हक्क मिळाले. आपल्या बुरुजाला जी भेग पाडली आहे तीत संघटनेचा चुना वगैरे घालून आपण ती भरून काढली पाहिजे. आपले सरकारी अधिकारी पाहिजेत, मंत्री पाहिजेत, मध्यवर्ती सरकारातही मंत्री पाहिजेत. असे असता सात प्रांतात काँग्रेस मंत्रिमंडळे झाली, पण गांधींचा दृष्टिकोन बदलला नाही किंवा त्यांच्या हृदयात पालटही झाला नाही. परवा गांधींनी मद्रासचा दौरा काढला. तेथे अस्पृश्यांची व तुमची एवढी तेढ का? असा एकाने प्रश्न केला, तेव्हा सरळ व स्पष्ट उत्तर न देता गांधींनी काहीतरी उडवाउडवीचे उत्तर दिले व इंग्रजांनी यांना अधिकाराची चटक लावली असे उद्गार काढले. मराठे, मुसलमान, तसेच ख्रिश्चन, ॲंग्लो इंडियनांना नोकऱ्या देतात त्याबद्दल गांधींचे काही म्हणणे नाही. फक्त अस्पृश्यांना दिल्या की त्यांच्या पोटात दुखते असा अनुभव आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ फेब्रुवारी १९४६, दहिवडी, सातारा.

आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध

"हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येतेे. पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवारा यांची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यातून नाहीसा करणे, चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे त्याचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर, माझ्या मताप्रमाणे, हेच औषध आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १ सप्टेंबर १९५१, औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्याच्या प्रसंगी केलेल्या ऐतिहासिक भाषणातून.

धर्माच्या नावावर जमविलेल्या पैशाचा विनियोग

"धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहोत, एवढेच नव्हे तर आजकालच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो अनिष्ट बाबींवर खर्च केला जातो. आज जगात दारिद्र्य आणि दुःख असताना अशारितीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राम्हणादि आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे. गौतम बुद्धांनी हा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळला होता. त्यांनी आपल्या नैतिक शास्त्रात पंचशील, अष्टांग मार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना खालील दहा तत्त्वे आत्मसात करण्यास सांगितली आहेत. ती अशी: (१) प्रज्ञा, (२) शील, (३) नेखम्म, (४) दान, (५) वीर्य, (६) खन्ति, (७) सच्च, (८) अधित्थान, (९) मैत्री, (१०) उपेक्खा.

ज्यामुळे अज्ञानांधकार नाहीसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश; शील म्हणजे नैतिक विचार; कोणतीही वाईट गोष्ट करू नये, परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करीत राहावे. नेखम्म म्हणजे ऐहिक सुखापासून अलिप्त राहणे. दान म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तन-मन-धन अर्पण करणे. वीर्य म्हणजे धैर्य, कसोटी की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे. खन्ति म्हणजे सहनशीलता. द्वेषाला द्वेषाला उत्तर न देणे. सच्च म्हणजे सत्य. प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये. सत्य बोलावे. जे बोलावे ते सत्यच असावे. अधित्थान
म्हणजे मनोनिग्रह. मैत्री म्हणजे प्रेम. मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो. मानवाविषयी असो किंवा इतर प्राणीमात्राविषयी असो. उपेख्खा म्हणजे उपेक्षा, ज्यामुळे मन सुखदुःखाच्या पलीकडे गेले असून कोणत्याही परिणामाने विचलित न होता कर्तव्यपरायण राहणे. वरीलपैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात करावे अशी बुद्धाची अपेक्षा होती. म्हणूनच पाली वाङ्मयात असे म्हटले आहे की गौतम बुद्धांनी वरीलप्रमाणे "दान पारमिता" जरी शिकविली असली तरी दान हे सत्पात्री असण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होताच. देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला दान दिले जाते त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नये. पददलितांना एक दिवस स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ती जिला आपण मदत म्हणतो तेच खरे दान. साधुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल तर त्याचा पारमिता मध्ये सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई इतकी आहे की सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशाचा विनियोग रुग्णालये, शिक्षण, बेकारांसाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काहीतरी धंदे-शिक्षण देणे, अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जर जमा केलेल्या पैशाचा विनियोग अशा रीतीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २४ जानेवारी १९५४, झेवियर कॉलेजचे मैदान, अखिल भारतीय साई भक्त संमेलन