Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

आपला उद्धार करायला आपणच कंबर कसली पाहिजे

मुंबई- चिराबझार येथे 4 जून 1927 रोजी रात्री साडेआठ वाजता बहिष्कृत वर्गाची जंगी जाहीर सभा बहिष्कृत भारताचे संपादक डॉ. बी आर आंबेडकर, बार-ॲट-लॉ यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेतील बाबासाहेबांच्या भाषणातून...

"आपला उद्धार करायला आपणच कंबर कसली पाहिजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिद्ध करून घेतली पाहिजे. या कामात अनेकांचे बळी पडतील. आपल्या पूर्वजांनी रणांगणात आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिद्ध केलेला आहे. आता आपण आपल्या बुद्धिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकाविली पाहिजे!" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

**********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
**********************************

आधी राजकीय मग सामाजिक ही मीमांसा नादानपणाची

बेळगांव जिल्ह्यातील निपाणी गावी "मुंबई इलाखा प्रांतिक बहिष्कृत परिषद: अधिवेशन तिसरे" या सभेतील बाबासाहेबांच्या भाषणातून. (दि. 11 एप्रिल 1925)
वैकम सत्याग्रहाच्या संदर्भाने बाबासाहेबांनी हे विचार मांडले:
"आधी राजकीय मग सामाजिक, ही मीमांसा अगदी नादानपणाची आहे, हे आता सिद्ध झाले आहे. कारण आज इतके दिवस नुसते राजकारण शिजत घातल्यानंतर जर राजकीय ध्येयाच्या आड कोणती बाब येत असेल तर ती सामाजिकच होय. सामाजिक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की, त्याला कितीही भिजत पडू दे म्हटले तरी तो प्रश्न दत्त म्हणून पुढे उभा राहतोच. ज्या राजकारणी धुरंधर पुरुषांनी सामाजिक प्रश्न बाजूस ठेवून नुसते राजकारण हाती घेतले व इतरांस घेण्यास लाविले त्यांनी काहीच साधले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक प्रश्न बाजूस टाकल्यामुळे त्यांच्या राजकीय ध्येयाची साध्यता त्यांची त्यांनीच बिकट करून टाकली. यास आजची परिस्थिती साक्ष देत आहे. तो सामाजिक प्रश्न त्यांनी वेळीच हाती घेतला असता तर आज सर्वत्र दिसून येत असलेली तेढ व दुही दृष्टीस पडती ना!" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
 **********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
**********************************

समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्यबुद्धीने झटले पाहिजे

"आपला समाज आज सर्वतोपरी मागासलेला आहे. द्रव्याने मागासलेला आहे. मनोधैर्याने मागासलेला आहे. ज्या समाजातील लोकांस राजकीय, सामाजिक व धार्मिक असमता व अन्याय यापासून पराकाष्ठेचा त्रास होत आहे. ज्यातील सार्‍या लोकास गूढ अज्ञानाने व्यापिले आहे. ज्यास विपत्तिपासून होणाऱ्या यातना सोसाव्या लागत आहेत व त्याच्या परिहारार्थ काय करावे समजत नाही, त्या लोकांची सर्वत्र चाललेल्या जीवनकार्यात अखेर गती काय होईल हे सांगता येणे फार कठीण आहे. यासाठी आपल्यापैकी ज्यांना ही स्थिती स्पष्टपणे कळत असेल व ज्यांच्या मनात कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपल्या समाजाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असून ते जर स्वस्थ राहतील, तर त्यांच्या माथ्यावर आपल्या दडपून गेलेल्या बांधवास विपन्नावस्था आणिल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित बांधवहो! जर तुम्हाला इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यावयाचे असेल व तुमची आज जी स्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतांनी व दुराचारांनी आपल्या लोकांच्या बुद्धीचा, कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालविला आहे त्यांचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे व ते आपण केले पाहिजे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बार्शी, जिल्हा सोलापूर येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे 1924 मध्ये झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण. (ज्ञानप्रकाश, 24 मे 1924 व 7 जून 1924)

(खंड 18, भाग 1)