Showing posts with label शिक्षण. Show all posts
Showing posts with label शिक्षण. Show all posts

शिक्षणाच्या अभावी माणूस जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो

 *"शिक्षणाच्या अभावी माणूस जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (जुलै १९२७)
*********
"उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाचे अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो. अर्थात, मुलांच्या शरिराची व बुद्धीची शक्य तेवढी चांगली जोपासना करणे हे प्रत्येक आईबापाचे कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचशा लोकांच्या हातून शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कर्तव्य पार पडत नाही. पोट हे दरेकाच्या मागे लागलेले असते व ते भरण्यास अनेक लोक अनेक प्रकारचे व्यवसाय करीत असतात. एकदा एक व्यवसाय पिढीजात झाला म्हणजे तोच पुढे चालू होतो; त्यात सहसा बदल होत नाही. या अनेक व्यवसायांपैकी शिक्षण हा एक व्यवसाय आहे व ज्या जाती त्यांत पडतात त्यांचा तो धंदा होऊन बसतो. ब्राह्मण लोक शिक्षण घेतात व इतर वर्ग घेत नाहीत याचे तरी कारण हेच की शिक्षण हा जसा ब्राह्मण जातीचा धंदा झाला आहे तसा तो इतर जातींचा झालेला नाही. तुम्ही शिक्षण घ्या म्हटले असता आम्हाला काय ब्राह्मण व्हायचे आहे, असे जे अब्राह्मण लोकांकडून उत्तर मिळते त्याचे इंगित यातच आहे. शिवाय अब्राह्मण लोकांत मुलाबाळांना शिक्षण देण्याची मनापासूनची इच्छा असली तरी ती सहज सफल होत नाही. मुलाला शाळेत घातले तर त्याचा दुहेरी बोजा आईबापांवर पडतो. एक तर मुलगा शाळेत गेला तर त्याच्यापासून होणारी कमाई बंद होते व तो आईबापांच्या अंगावर पोस पडतो. दुसरे, त्याच्या शिक्षणासाठी होणारा खर्च त्याच्या आईबापांस सोसावा लागतो. म्हणजे शिक्षणाच्या पायी कमाईची आयात बंद होऊन खर्चाच्या निर्गतीला मात्र सुरुवात होते. त्यामुळे हातावर कमवून जीवित कंठणाऱ्या आईबापांना खर्चाचा बोजा झेपत नाही व म्हणून त्यांची प्रजा पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या गर्तेत खितपत पडलेली असते." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.(१९२७)

********
अग्रलेख ("आप घरी बाटा, बाप घरीही बाटा!") : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७
********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९, पान क्र. २१२-२१८)
********

शील आणि शिक्षणाशिवाय काहीच साध्य होणार नाही

"तुम्ही एक गोष्ट कधीही विसरता कामा नये आणि ती ही की, 'शील आणि शिक्षण हे जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही.' दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळविण्याकरिता लढा चालविला आहे; त्यात तुम्हास यशस्वी व्हावयाचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसाच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे. हे तुम्ही जर करणार नाही तर ध्यानात ठेवा, तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्तेत पडाल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. ११ फेब्रुवारी १९३६, अहमदनगर

विद्यार्थ्यांनी निरंतर ज्ञानार्जन हेच ध्येय ठेवावे

"विद्यार्थीदशेत ज्ञानार्जन चालू असता विद्यार्थ्यांनी आपल्यापुढे निरंतर "ज्ञानार्जन" हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही. या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे. समाजसेवेस पुढील आयुष्यात विपुल काळ आहे. विद्यार्थिदशेत व्याख्यान देऊन समाजाचे होणारे तात्कालिक हित हे पूर्ण ज्ञान संपादन झाल्यानंतर अनेक प्रकारे अधिकार प्राप्तीने सेवा करता येऊन समाजाचे जे हित साधता येईल त्या हितापेक्षा शतपटीने हिणकस आहे. या तत्त्वांची पूर्ण जाणीव ठेवून शिक्षण प्राप्ती हेच आपले सध्याचे ध्येय ठेवावे."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १० सप्टेंबर १९३२, दामोदर हॉल, परळ, मुंबई

शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही

"शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक कार्ये अंगीकारली. राजकारणात माझा विशेष महत्त्वाचा काळ गेला. सध्या राजकारणाच्या दोऱ्या उच्चवर्णीयांच्या हातात आहेत. त्या दोऱ्या तशाच हाती ठेवण्यासाठी उच्चवर्णीयांची धडपड चाललेली आहे. उच्च प्रतीच्या माऱ्याच्या जागा पटकावण्यासाठी जी विद्या पाहिजे ती अजून उच्चवर्णीयांखेरीज इतरांना प्राप्त झालेली नाही. "जिच्या हाती पाळण्याची दोरी..." असे काही म्हटले जाते, त्याचप्रमाणे राजकारणाच्या दोर्‍या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत. राजकीय सत्ता हाती यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत, पण त्यांना यश येत नाही. या तफावतीचे अधिष्ठान हेच आहे. इंजिनिअर, कलेक्टर वगैरे जागा फक्त उच्चवर्णीयांनाच शिक्षणामुळे मिळतात. शंभर पैकी जवळजवळ ९९ इंजिनिअर, ९९ कलेक्टर असे उच्चवर्णीयांचे असतात. त्यामुळे त्यांच्या हाताखालील जागा ते आपल्या लोकांना देत असतात." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १४ जानेवारी १९४८, धोबी तलाव नाईट स्कूल, मुंबई

आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध

"हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येतेे. पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवारा यांची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यातून नाहीसा करणे, चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे त्याचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर, माझ्या मताप्रमाणे, हेच औषध आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १ सप्टेंबर १९५१, औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्याच्या प्रसंगी केलेल्या ऐतिहासिक भाषणातून.

आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी काम करणार आहे

"मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे. मी मिळविलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. ते सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे. परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन, एवढा मला आत्मविश्वास आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा."

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९२४, मुंबई. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सक्रिय सभासदांना उद्देशून. आपापसात तेढ निर्माण होऊ देऊ नका, हे सांगताना...)

नेहमीच जुने ते सोने म्हणून चालणार नाही

सदोदित जुने ते सोने म्हणून चालणार नाही. वडिलांनी जे केले तेच त्यांच्या मुलांनी करावे हा शिरस्ता काही रास्त नाही. वस्तुस्थिती बदललल्याबरोबर आचार विचार पालटणे आवश्यक असते. तसे जर आपण केले नाही तर आपल्या परिस्थितीशी टक्कर देण्यास आपण कधीही समर्थ होणार नाही. नुसती काळावर भिस्त ठेवून चालणे हितावह होणार नाही. कालगतीबरोबर आपल्या हातून होईल तेवढे कार्य करणे अवश्य आहे. तसे जर आपण केले नाही तर काळ बदलेल पण आपल्या स्थितीत मात्र बदल होणार नाही. विधायक कार्य केल्याशिवाय इतका वेळ गेला आहे की जास्त वेळ जाऊ देणे हे आपल्या बर्‍याचे होणार नाही. या प्रांतातील आपल्या लोकांत शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नाही.
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Education is a Serious matter and Not a Tea Time Enjoyment

DBAWS, Vol. 17, Part III (2nd Jan 1945, Calcutta, address to students of Scheduled Castes)

Dr. Babasaheb Ambedkar advised the students not only to get degree but to see that the degree carried with it some positive knowledge or attainment, that they had qualifications which they called 'sterling.'

They must regard education as a serious matter and not a tea-time enjoyment.

विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या तत्त्वानुसार विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे

"विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. 'महाजनो येन गतः सपंथः' ही परप्रत्ययनेय बुद्धी सोडून विवेकाने, जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १२ डिसेंबर, १९५५. 

विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे

"बौद्धधर्माशी संलग्न झालेले 'मिलिंद' हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे; हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १२ डिसेंबर, १९५५. 

युवक कसे असावेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथे युवकांना मार्गदर्शनपर केलेलं भाषण :~
बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात, "मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे-पिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. खाणे-पिणे हे जगण्याकरीता असावे व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. "खायला काळ व भुईला भार" असे जगणे असले काय नि नसले काय सारखेच."
ते पुढे म्हणाले, "तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की, 'तपा अंती फळ.' कार्य आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नतीचे असो; कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे. मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की, जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते, चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. हे योग्य नाही. कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही. जगात खुळी माणसे फारच थोडी निपजतात. तसेच बुद्धीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे. २४ तासापैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत २० तास टेबलावर बसून काम केले आहे. ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी तप केले पाहिजे. श्रम केले पाहिजेत."
"मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये. ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल. हरेक तरुणात महत्वाकांक्षा असली पाहिजे. महत्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. यासाठी अस्पृश्य मानलेल्या तरुणांमध्ये महत्वाकांक्षेचे बीज प्रथम रुजले पाहिजे. सर्व परिस्थितीवरुन निराश होणे स्वाभाविक असले तरी आज आपण निराश न होता मनात उच्च महत्त्वाकांक्षा धरून त्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करावयास हवी आहे."
"आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत. आज शिक्षणाच्या ज्या सोयी आहेत त्या आमच्या वेळी मुळीच नव्हत्या. आम्हास त्या काळी कोणाचीच मदत नव्हती. मी विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी, एक बकरी, सरपण, चूल, इ. सर्व सामान असे ८ बाय ८ च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून मला काॅलेजचा अभ्यास करावा लागत असे. ती स्थिती आज बदललेली आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने सुविद्द्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. परंतु त्याचबरोबर आज विद्येची मला मोठी भिती वाटते. शिकलेल्या लोकांची तशी सर्वांनी भिती बाळगली पाहिजे. कारण शिक्षण ही तलवार आहे. शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्व जण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम; परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशूपेक्षाही क्रूर व भितीप्रद समजण्यात यावा. अज्ञ जनतेस छक्केपंजे, डावपेच करता येत नाहीत. शिकल्यासवरलेल्यांना ते अवगत असतात. दीनदुबळ्या, गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले-सवरलेले शेठजी, भटजी, वकील वगैरे सर्व लोक घेतात. अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धिःकार असो अशा शिक्षणाला. त्या दृष्टीने पाहता शील फार महत्त्वाचे आहे. अलीकडे तरुणांत धर्माबद्दल औदासिन्य दिसते. परंतु माझ्यात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील व माझ्या शिक्षणाचा जो काही जनतेसाठी उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे; परंतु धर्माचे ढोंग नको. तेव्हा शीलाला अधिक महत्त्व द्या. तसेच, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करता जर शिकून आपली नोकरी भली आणि आपली बायका-मुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणार असतील तर त्यांचा समाजाला काय उपयोग? तरुणांवर आज पडलेली जबाबदारी ओळखून कार्यास लागावयास हवे. जनतेच्या अंगी भित्रेपणा दिसतो. आपले कायदेशीर हक्क बजावण्यासाठीसुद्धा ते धैर्याने पुढे येऊ शकत नाहीत. ही परिस्थिती फक्त तरुणच बदलू शकतील. त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे."
(अंशतः)

संदर्भ :~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि  भाषणे
#डॉबाबासाहेब #आंबेडकर
#विचार #भाषण  #युवा

भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते

भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते, ह्यासंबंधी विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
***********************************
एल्फिन्स्टन काॅलेज, १५ डिसेंबर १९५२
"उच्च विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची काॅलेजची चार वर्षे संपून जातात आणि विद्यापीठाच्या पदव्या घेऊन ते बाहेर पडतात. पण त्यांना प्लेटो, बेकन, नित्से, स्पिनोझा यासारख्या महाश्रेष्ठ तत्त्वज्ञान्यांच्या तत्त्वज्ञानासंबंधी अवाक्षरही माहिती नसते. ज्या तत्त्वज्ञानाने जगाची उभारणी केली, किंबहुना आजचा नव मानव आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या तत्त्वज्ञानावर जगत आहे त्या थोर तत्त्वज्ञानाची उपेक्षा आजच्या पदवीधरांकडून व्हावी यापेक्षा अति लाजिरवाणी गोष्ट कोणती? याउलट आजची विद्यापीठे जेम्स आणि चार्ल्स यांचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांच्या माथी जबरीने लादत आहे. विद्यार्थ्यांनी या गोष्टी स्वतःच ओळखायला पाहिजेत आणि आपल्याला योग्य शिक्षण पाहिजे याची हाकाटी त्यांनी केली पाहिजे."
"मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मुल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत. ती कालमानाप्रमाणे प्रत्यही बदलत राहतात. नुसती बदलतातच नव्हे तर ती प्रगत होत जातात. भारतीय विद्यार्थ्यांनीही या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमुल्यांची दखल घेतली पाहिजे आणि आपणही ती आचरणात आणण्यास सिद्ध राहिले पाहिजे. हे नवे तत्त्वज्ञान आपल्या विद्यादायी संस्था आपल्या शिक्षणक्रमात घालतात की नाही याकडेही पाहिले पाहिजे."
"पण खेदाची गोष्ट ही की, आधुनिक विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत खाली चाललेली आहे. भूतकालातील मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बौद्धिक पातळी का खाली घसरली याचा विद्यार्थ्यांनी विचार करणे आवश्यक आहे आणि या परागतीचे कारण अगदी स्पष्ट आहे. आजचा विद्यार्थीवर्ग भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञान व वाङ्मयकृतींचा अभ्यास मन लावून करीत नाही."
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
***********************************
जनता: २० डिसेंबर १९५२
***********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************
#बाबासाहेब #आंबेडकर  #जयंती_2019

अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही

अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
********************************************
हैद्राबादच्या मुक्कामात दि. १४ नोव्हेंबर १९५४ रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंड' तर्फे संचालित होस्टेलला भेट दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेळाव्यापुढे केलेले भाषण:
********************************************
"ज्या लोकांनी ही बोर्डींग काढली आहेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर हैद्राबाद सरकारचेही आभार मानणे जरूर आहे. लोक आपणास नावे ठेवतील अशाप्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये. त्यांना मिळालेल्या या संधीचा वेळीच योग्य फायदा करून घेतला पाहिजे. माझ्यावेळची परिस्थिती फारच कठीण होती. आमची दहा बाय दहाची एक खोली होती. तीत सामान, कुटुंबातील दहा माणसे, एक बकरी व दोन पैशाच्या तेलाची एक चिमणी इतका परिवार होता. अशा परिस्थितीत मला अभ्यास करावा लागला आहे. मी फार अभ्यास केला असल्यामुळे लोक मला भितात. दुसऱ्यांनी वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते मी दोन मिनिटात करतो (टाळ्या). याचे कारण मी फारच शिकलो आहे. तसेच तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपुरे विद्यार्जन करून काही उपयोगाचे नाही. परीक्षा कोणीही पास होतो. नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळविण्यात काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखविले पाहिजे. दगड फोडीचे काम करण्यात व कारकून बनण्यात काहीच फरक नाही.
या देशात ब्राह्मण समाजाची अशी समजूत होती की, विद्या फक्त आम्हीच प्राप्त करु शकतो. परंतु हे साफ खोटे आहे. कोणा एका युरोपियनाने म्हटले आहे की जगात सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक होत. (टाळ्या). विद्या ही एक तलवार आहे. या तलवारीने कोणीे कोणाची मान कापतो, तर शीलवान मनुष्य तरवारीने कुणाचे रक्षण करतो. त्यासाठी धर्मशील बनले पाहिजे. रोज सकाळ-संध्याकाळ सामुदायिक वंदना करून बौद्धतत्त्वाची उपासना केली पाहिजे. दर आठवड्याला वादविवादात्मक विषय ठेवून कोणालातरी बोलावून त्यावर व्याख्याने करविली पाहिजेत. तुम्हाला जगात कसे राहावे हे शिकविले जात आहे. तेव्हा, सुट्टीत घरी गेल्यावर आरोग्य व स्वच्छता याविषयी आई-वडिलांना माहिती सांगून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तुमच्या बोर्डींगला जी आर्थिक मदत मिळत आहे, ती तळ्यातील पाण्याप्रमाणे आहे. ती केव्हाना केव्हा आटणार हे निश्चित. यासाठी सरकारने कायम स्वरूपाच्या मदतीची सोय केली पाहिजे."
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

#बाबासाहेब  #आंबेडकर
************
जनता: २० नोव्हेंबर १९५४
************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************