Showing posts with label स्वराज्य. Show all posts
Showing posts with label स्वराज्य. Show all posts

माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे

"माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही. पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे. अधिकाराच्या व माऱ्याच्या जागी आमची माणसे हक्काने आली पाहिजे. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदार संघासाठी मी भांडलो. स्पृश्यांनी निवडलेली माणसे आम्हाला प्रतिनिधी नकोत म्हणून मी आग्रह धरला. अखेर मी विजयी झालो व स्वतंत्र मतदारसंघ मिळविला. पण गांधींना पोटदुखी उठली. अस्पृश्यांना स्वाभिमानाचे हक्क जे मिळाले ते दुष्टपणाने हिरावून घेण्यासाठी त्यांनी आमरण अन्नसत्याग्रह केला व आपले हक्क हिरावून घेतले. त्यामुळे आपल्याला फारच कमी हक्क मिळाले. आपल्या बुरुजाला जी भेग पाडली आहे तीत संघटनेचा चुना वगैरे घालून आपण ती भरून काढली पाहिजे. आपले सरकारी अधिकारी पाहिजेत, मंत्री पाहिजेत, मध्यवर्ती सरकारातही मंत्री पाहिजेत. असे असता सात प्रांतात काँग्रेस मंत्रिमंडळे झाली, पण गांधींचा दृष्टिकोन बदलला नाही किंवा त्यांच्या हृदयात पालटही झाला नाही. परवा गांधींनी मद्रासचा दौरा काढला. तेथे अस्पृश्यांची व तुमची एवढी तेढ का? असा एकाने प्रश्न केला, तेव्हा सरळ व स्पष्ट उत्तर न देता गांधींनी काहीतरी उडवाउडवीचे उत्तर दिले व इंग्रजांनी यांना अधिकाराची चटक लावली असे उद्गार काढले. मराठे, मुसलमान, तसेच ख्रिश्चन, ॲंग्लो इंडियनांना नोकऱ्या देतात त्याबद्दल गांधींचे काही म्हणणे नाही. फक्त अस्पृश्यांना दिल्या की त्यांच्या पोटात दुखते असा अनुभव आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ फेब्रुवारी १९४६, दहिवडी, सातारा.

तुमच्या निर्णयावर भितीचा किंवा उपकाराचा परिणाम होऊ देऊ नका

"एकदा एका चिनी शिंप्याकडे नवीन कोट शिवावयास टाकला होता व नमुन्यासाठी म्हणून त्याला जुना कोट दाखविला. तेव्हा त्याने मोठ्या गर्वाने त्या नमुन्याबरहुकूम ठिगळे, चिरा इत्यादी सर्वासह नवीन कोट शिवून दिला. ब्रिटिशांच्या काळात तुमच्या समाजरचनेतील दोषांची छिद्रे व वर्णव्यवस्थेची ठिगळे त्यांनी दुरुस्त न करता जशीच्या तशीच ठेवली. आणि याहीपुढे जाऊन मी तर असे म्हणेन की, इंग्रजांच्या सर्व शक्तीचा व तत्त्वांचा विचार करता तुमच्या तक्रारी निवारण करण्याची व येथील समाजरचनेत बदल घडवून आणण्याची लायकीच ब्रिटिशांजवळ नाही. आणि जोपर्यंत तुमच्या हातात शासनसत्ता येत नाही तोपर्यंत तुम्ही या तुमच्या दुःखाचे निवारण करु शकत नाही. आणि जोपर्यंत ब्रिटिशांचे राज्य येथे आहे तसेच कायम राहील तोपर्यंत तुमच्या हातात शासनसत्तेचा वाटा येऊ शकत नाही, तर स्वराज्याच्या घटनेमध्येच तुमच्या हातात शासनसत्तेचा काही वाटा मिळण्याची शक्यता असून त्यावाचून तुम्ही तुमच्या लोकांना मुक्ती मिळवून देऊ शकत नाही. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या हातातील स्वराज्य म्हणजे भुतांचा बाजार आहे, हेही मला माहीत आहे... दलित वर्गावर आमच्या देशातील लोकांनी जे अन्याय, अत्याचार व जुलूमजबरदस्ती केली त्याची मला आठवण आहे आणि भावी स्वराज्यात असेच जुलूम या लोकांवर होतील की काय अशीही मला भिती वाटते. परंतु सद्गृहस्थांनो! काही क्षणासाठी तुम्ही जर भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला आणि भावी स्वराज्यातील काही वर्गापासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणाऱ्या घटनादत्त संरक्षण तरतुदींचा तुम्ही विचार केला तर भावी स्वराज्य हा भूतांचा बाजार ठरण्याऐवजी तुमच्या हातात सत्ता येण्याची शक्यता तुम्हाला दिसून येईल आणि इतरांबरोबर तुम्हीही या देशाचे सार्वभौम राज्यकर्ते व्हाल. भूतकाळाचे भूत तुमच्यावर स्वार होऊ देऊ नये. तुमच्या निर्णयावर कोणत्याही भितीचा किंवा उपकाराचा परिणाम होऊ देऊ नका."
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8 ऑगस्ट 1930
**********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
**********************************