Showing posts with label विद्यार्थी. Show all posts
Showing posts with label विद्यार्थी. Show all posts

विद्यार्थ्यांनी निरंतर ज्ञानार्जन हेच ध्येय ठेवावे

"विद्यार्थीदशेत ज्ञानार्जन चालू असता विद्यार्थ्यांनी आपल्यापुढे निरंतर "ज्ञानार्जन" हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही. या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे. समाजसेवेस पुढील आयुष्यात विपुल काळ आहे. विद्यार्थिदशेत व्याख्यान देऊन समाजाचे होणारे तात्कालिक हित हे पूर्ण ज्ञान संपादन झाल्यानंतर अनेक प्रकारे अधिकार प्राप्तीने सेवा करता येऊन समाजाचे जे हित साधता येईल त्या हितापेक्षा शतपटीने हिणकस आहे. या तत्त्वांची पूर्ण जाणीव ठेवून शिक्षण प्राप्ती हेच आपले सध्याचे ध्येय ठेवावे."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १० सप्टेंबर १९३२, दामोदर हॉल, परळ, मुंबई

तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घालण्याची जबाबदारी

"स्वातंत्र्य, समता व भ्रातृभाव यांच्या आपण खूप गप्पा मारतो. नव्हे, या त्रयीवर आपण व्याखानेही झोडू शकतो. परंतु या तिन्हीपैकी एकतरी आपल्या भारतीय समाजात बसत आहे की नाही याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही तत्त्वांची आणि व्यवहाराची सांगड घालण्याची आपणावर काहीच जबाबदारी नसल्याचे वाटते.
 
भारतामध्ये बहुसंख्य जनता अज्ञान आणि भोळसर खुळ्या कल्पनेत गुरफटून गेली आहे. नव्हे, येथील समाजरचनाच खुळ्या कल्पनांना जन्म देते. म्हणून उपास-तापास, नवस-सायास, देव-देवऋषी करणे म्हणजे धर्म पालन करणे अशी लोकांची भावना झालेली आहे. या खुळ्या आणि धर्मभोळ्या जनतेची या कल्पनेतून सुटका करावयास पाहिजे. विद्यार्थ्यांनी चाळी-चाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत. तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठी उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा व प्रगती करण्याकरिता केला पाहिजे. तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.

जगातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडविण्याचा मानव सारखा प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच निरनिराळे सिद्धांत पुढे मांडण्यात येतात. कार्ल मार्क्स आज आपणापुढे खरा प्रश्न आहे. आजचे प्रश्न सोडविण्यास मार्क्सच्या विचारसरणीऐवजी दुसरी एखादी प्रभावी विचारसरणी उपयोगी पडेल काय? हाच आजच्या काळाचा प्रश्न आहे. आपले सारे प्रश्न सोडविण्यास कार्ल मार्क्सचे सिद्धांत समर्थ ठरतील की नाही हीच आजची समस्या आहे. ही समस्या आजच्या पिढीने शक्य तितक्या लवकर सोडविली पाहिजे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. २ मे १९५४, सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथील यूथ असेंब्लीच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून 
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

बहिष्कृत विद्यार्थी व बहिष्कृतांचे भवितव्य

बहिष्कृत विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यावर बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून आहे.

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या तत्त्वानुसार विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे

"विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. 'महाजनो येन गतः सपंथः' ही परप्रत्ययनेय बुद्धी सोडून विवेकाने, जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १२ डिसेंबर, १९५५.